मायग्रेन ही अशी एक समस्या आहे ज्यामध्ये तुमच्या डोक्याचा अर्धा भाग प्रचंड प्रमाणात दुखू लागतो. कधी कधी ही डोकेदुखी सतत जाणवते तर कधी कधी कमी- जास्त प्रमाणात डोकं दुखण्याचा त्रास जाणवतो. एकदा सुरू झाल्यावर काही मिनीटांपासून ते अगदी काही दिवसांपर्यंत ही डोकेदुखी जाणवू शकते. मायग्रेन ही एक न्युरोलॉजिकल आरोग्य समस्या आहे.

मायग्रेनचे दोन प्रकार आहेत
- क्लासिकल मायग्रेन– क्लासिकल मायग्रेनमध्ये डोकेदुखी सुरू होण्याआधी काही लक्षणे जाणवतात.
- नॉन क्लासिकल मायग्रेन– नॉन क्लासिकल मायग्रेनमध्ये मात्र अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो.
मायग्रेनचा त्रास होण्याची कारणे:
मायग्रेनचा त्रास प्रखर उजेड, एखादा उग्र वास, चिंता-काळजी अथवा कर्णकर्कश आवाज यामुळे सुरू होऊ शकते. या व्यतिरिक्त अनेक कारणे आहेत ज्यामुळे तुमचं डोकं दुखू शकते. उच्च रक्तदाब, अपूरी झोप, ताण- तणाव, अधिक प्रमाणात पेनकिलर घेणे, वातावरणातील बदल, अॅलर्जी, धूर, हॉर्मोन्समधील बदल, अधिक प्रमाणात मासे, शेंददाणे किंवा लोणचं खाण्यामुळे मायग्रेन होण्यामागची हि करणे असू शकतात.
मायग्रेनचा त्रास होण्याची लक्षणे.
भूक कमी लागणे, कामात रस न वाटणे, डोक्याचा अर्धा भाग दुखणे, घाम सुटणे, मळमळ, उलटी, प्रखर उजेड सहन न होणे,तीव्र आवाज सहन न होणे,अशक्तपणा,डोळे दुखणे, धुसर दिसू लागणे, खाद्यपदार्थांची अॅलर्जी असणे हि मायग्रेन ची लक्षणे आहेत .
मायग्रेनपासून वाचण्यासाठी घेण्याची काळजी.
मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांनी सतत सावध असणं फार गरजेचं आहे. आधीच काही गोष्टींची काळजी घेतली तर मायग्रेनच्या त्रासापासून वाचणं नक्कीच शक्य आहे.
डोकं मायग्रेनमुळे दुखत असेल तर त्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे. कडक उन्हात घराबाहेर पडू नका, उग्र वासचे परफ्युम लावू नका, प्रखर उजेडात काम करू नका, झोपताना दिवे बंद करा पुरेशी झोप घ्या, मेडीटेशन व योगा नियमित करा, कमी प्रकाशात डोळ्यांवर ताण येईल असे काम करणे टाळा.दररोज कमीत कमी 12-15 ग्लास पाणी प्या, उन्हाळ्यात गरम कॉफी अथवा वाफाळता चहा घेणे टाळा.